Home Cities यावल यावलच्या गंगानगर गार्डनमध्ये नियमबाह्य वृक्षतोड; दोषी व्यापाऱ्यावर कठोर कारवाईची गटनेत्या वर्षा चोपडे...

यावलच्या गंगानगर गार्डनमध्ये नियमबाह्य वृक्षतोड; दोषी व्यापाऱ्यावर कठोर कारवाईची गटनेत्या वर्षा चोपडे यांची मागणी

0
1

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गंगानगर गार्डन व लगतच्या परिसरात अनेक वर्षांपासून उभी असलेली मोठी, उंच आणि हिरवीगार जिवंत झाडे एका व्यापाऱ्यामार्फत सर्रास तोडून नेण्यात आल्याची अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे. पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या या बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित व्यापारी व यात सहभाग असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) च्या नगरसेविका तथा गटनेत्या वर्षा आकाश चोपडे यांनी यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रकरणी नगरसेविका वर्षा चोपडे यांनी नगरसेविका कल्पना वाणी यांच्यासमवेत नगरपालिका प्रशासनाला व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले. गंगानगर गार्डन आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ५ ते ७ मोठी, बहुवार्षिक आणि परिपूर्ण जिवंत झाडे नियमबाह्य पद्धतीने तोडण्यात आली आहेत. ही झाडे अत्यंत जुनी व मोठी असल्याने त्यांचा शहराच्या पर्यावरण संतुलनात आणि हरित क्षेत्रात मोठा वाटा होता. स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात सावली देणाऱ्या या झाडांची अशा प्रकारे निष्काळजीपणे व बेकायदेशीर कत्तल झाल्याने नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील जुनी व जिवंत झाडे ही केवळ सार्वजनिक मालमत्ता नसून पर्यावरणाचा अमूल्य ठेवा आहेत, त्यामुळे कोणत्याही व्यापाऱ्याला अथवा व्यक्तीला मनमानी पद्धतीने झाडे तोडण्याचा अधिकार नाही. सदर वृक्षतोड करण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने नगरपालिका किंवा वृक्ष प्राधिकरणाची रीतसर पूर्वपरवानगी घेतली होती का, याची तत्काळ शहानिशा करण्यात यावी. जर परवानगी घेतली असेल तर त्यातील अटी व शर्तींचे पालन झाले आहे का, आणि परवानगी नसेल तर संबंधित व्यापाऱ्यावर कोणतीही हयगय न करता गुन्हा दाखल करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
प्र प्रशासनाने त्वरित घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करावा, तसेच तोडलेल्या झाडांची संख्या, त्यांचा प्रकार, आकार आणि वय यांची नोंद करावी. तोडलेल्या झाडांचे मौल्यवान लाकूड कुठे वाहून नेण्यात आले, त्याची विक्री झाली आहे का, याचीही सखोल चौकशी व्हावी. यावल शहराच्या निसर्गसंपदेचे रक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, असेही चोपडे यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound