यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची आणि कॉंक्रिटीकरणाची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून थाटलेली दुकाने आता कायमची हद्दपार होणार असून अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
यावल शहराच्या मुख्य भागातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती. या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी प्रचंड कमी झाली होती, ज्यामुळे दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सीमा ओलांडून रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले होते. या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक नागरिक कायमचे दुखापतग्रस्त झाले होते. वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी हे अतिक्रमण मोठी डोकेदुखी ठरले होते.

दरम्यान, यापूर्वी तत्कालीन कार्यतत्पर तहसीलदार कैलास कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे अतिक्रमण हटवण्यात मोठे यश मिळाले होते. मात्र, काही दिवस उलटताच या मार्गावर पुनश्च ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली होती आणि अतिक्रमणे पुन्हा उभी राहिली होती. आता हा संपूर्ण मार्ग अधिकृतपणे राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्यामुळे बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. यावल शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयापासून ते जुना चोपडा नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे उच्च गुणवत्तेचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. रावेर, सावदा आणि फैजपूर येथील काम पूर्ण झाल्यानंतर आता यावल शहरातील अतिक्रमणे पूर्णपणे निष्कासित करून रस्त्याच्या नूतनकरणास प्रारंभ केला जात आहे.



