जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत अकोला शहर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून भुसावळ तालुका व बोदवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे सराफा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. १२९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) तसेच बोदवड पोलीस स्टेशन गु.र.नं. १२८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) या गुन्ह्यांमध्ये आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८), रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ, जि. जळगाव हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने अकोला येथे रवाना होत गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, आरोपीने दिलेल्या माहितीनुसार ३२ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. तसेच बोदवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांमधून एकूण ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध घेतला. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ. गोपाळ गव्हाळे, पोना. विकास सातदिवे, पोकों. प्रशांत परदेशी, पोकों. राहुल वानखेडे, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चापोकों. रिजवान शेख यांनी सहभाग घेतला. तसेच तांत्रिक मदतीसाठी पोकों. गौरव पाटील आणि पोकों. मिलिंद जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. विकास यशवंज बाविस्कर करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि तपास कौशल्याच्या आधारे फरार आरोपीला अकोल्यातून ताब्यात घेत दोन गुन्ह्यांतील सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलिसांच्या तपासातील प्रभावी कामगिरी पुन्हा अधोरेखित झाली आहे.



