पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुनील पवार यांची जळगाव पोलीस विभागांतर्गत ग्रेडपोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पदोन्नतीबद्दल पारोळा येथील छावा संघटना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सुनील पवार हे आपल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी परिचित आहेत. पोलीस सेवेदरम्यान त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद साधत आपुलकीने वागण्यावर भर दिला. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे.गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांवरही शांततेने, संयमाने आणि समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुनील पवार यांच्याकडून केला जात असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या सकारात्मक विचारसरणीसोबतच मेहनत, जिद्द, शिस्त आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळेच त्यांनी हे यश संपादन केल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हे पद महत्त्वाचे आणि अभिमानास्पद असून, या पदाची जबाबदारीही सुनील पवार हे यापुढे तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पदोन्नतीबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करत पुढील पोलीस सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यावेळी छावा संघटना पारोळा तालुकाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष विनोद पाटील, युवक तालुकाध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील, संघटक तथा आर्मी दिलीप पाटील यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



