Home Uncategorized पंढरीत विठ्ठलाचे दर्शन अन् नाशिकची मोठी जबाबदारी! गिरीश महाजन पालकमंत्री होताच जामनेरात...

पंढरीत विठ्ठलाचे दर्शन अन् नाशिकची मोठी जबाबदारी! गिरीश महाजन पालकमंत्री होताच जामनेरात जल्लोष

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील भाविकांसोबत पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेत असतानाच राज्याचे मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवत असतानाच नवी जबाबदारी मिळाल्याने हा योगायोग जामनेरकरांसाठी चर्चेचा आणि आनंदाचा विषय ठरला आहे. पालकमंत्रिपदाची घोषणा होताच जामनेर, जळगाव आणि नाशिकमधील समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास जामनेरच्या ग्रामीण मातीतून सुरू झाला. शेतकरी, सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रश्नांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी मतदारसंघात आपली मजबूत राजकीय ओळख निर्माण केली. राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध विभागांची जबाबदारी सांभाळल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाचा व्यापक अनुभव मिळाला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदासमोर सर्वात मोठे आव्हान आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन हे असणार आहे. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा, घाटांची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

यासोबतच गोदावरी नदी संवर्धन, नाशिक शहरातील वाहतूक कोंडी, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती या प्रश्नांवरही लक्ष देण्याची अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

पंढरीत विठ्ठलाचे दर्शन आणि त्याच दिवशी नाशिकची जबाबदारी मिळाल्याने “पांडुरंग पावला!” अशी भावना जामनेरमधील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, आता गिरीश महाजन यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound