Home Uncategorized मल्लिकार्जुन खर्गेंचा अपमान खपवून घेणार नाही!’ भुसावळात काँग्रेस आक्रमक; सत्याग्रहातून दिला थेट...

मल्लिकार्जुन खर्गेंचा अपमान खपवून घेणार नाही!’ भुसावळात काँग्रेस आक्रमक; सत्याग्रहातून दिला थेट इशारा

0
10

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकाराच्या निषेधार्थ भुसावळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावल नाका परिसरात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्व आणि जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने निषेध सत्याग्रह करण्यात आला. महात्मा गांधींचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने निषेध नोंदवला.

या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित प्रकाराविरोधात घोषणाबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, प्रतिष्ठा आणि सन्मानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा अवमान करण्याच्या प्रवृत्तीला समाजात थारा मिळता कामा नये, असा सूर आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

मल्लिकार्जुन खर्गे हे मागासवर्गीय समाजातून पुढे येत देशाच्या राजकारणातील सर्वोच्च जबाबदारीच्या पदावर पोहोचलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे कथित कृत्य घडणे हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांवर आघात करणाऱ्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

महात्मा गांधींच्या विचारांचा संदेश देणारे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या भावनेला बळ देत समाजात परस्पर सन्मान, सामाजिक एकात्मता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनस्थळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या छायाचित्रावर दूध अभिषेक करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकाराचा तीव्र निषेध करत अशा प्रवृत्तींविरोधात पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील, अशी भूमिका व्यक्त केली. सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या निषेध सत्याग्रहास जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमील शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार शिरीषदादा चौधरी, मुफ्ती हारून नदवी, योगेंद्र भैय्या पाटील, किरण राजमल पाटील, रवींद्र निकम, हरीश गंडवानी, ज्ञानेश्वर कोळी, अनंत परिहार, राजेंद्र पाटील, देवा भाऊ ठाकरे, वाय. एस. महाजन, कैलास शेळके, राहुल भालेराव, जगदीश गाडे, मुन्वर खान, प्रवीण सुरवाडे, इस्माईल गवळी, फयाज हुसैन, ऐश्वरी राठोड, शैलेश बोदडे, अश्फाक काझी, संतोष साळवे, राजेश डोंगरदिवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound