Home Cities जळगाव ‘हम सब एक हैं’चा जयघोष! तिरंगा हातात घेऊन सर्वधर्मीयांची भव्य रॅली

‘हम सब एक हैं’चा जयघोष! तिरंगा हातात घेऊन सर्वधर्मीयांची भव्य रॅली

0
36

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे १५ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय एकात्मता तिरंगा मोटारसायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले. १९९७ पासून सुरू असलेल्या या उपक्रमाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने युवक सहभागी झाल्याने शहरातील वातावरण देशभक्तीने भारून गेले.

रॅलीची सुरुवात सकाळी १०.३० वाजता भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकातून झाली. सर्वधर्मीय धर्मगुरूंनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ केला. हिंदू धर्माचे विघ्नहर्ता गणेश मंदिराचे पुजारी देवीलालजी व्यास, शनी मंदिराचे पंडित प्रभूजी महाराज, पंडित लक्ष्मण भगत, मुस्लिम धर्मगुरू असलम बाबा अशरफी, गुरुद्वारा सिंग सभा येथील शीख धर्मगुरू ग्यानी रविंदर सिंगजी, सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्चचे ख्रिस्ती धर्मगुरू फादर मुक्ती तसेच बौद्ध धर्मगुरू डॉ. एन. आनंदा महाथेरो यांची यावेळी उपस्थिती होती.

सै. अयाज अली नियाज अली यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेली. भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकातून निघालेली रॅली घाणेकर चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे स्वातंत्र्य चौकात रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा होता. ‘जश्ने यौमे आझादी जिंदाबाद’, ‘हिंदुस्थान जिंदाबाद’, ‘हम सब एक हैं’, ‘स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’, ‘जय हिंद’, ‘जय भारत’ अशा देशभक्तीपर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या घोषणांनी शहरातील वातावरण दुमदुमून गेले.

या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्मांच्या धर्मगुरूंचा एकत्रित सहभाग. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती आणि बौद्ध धर्मगुरूंनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धार्मिक सलोखा, बंधुभाव आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

१९९७ पासून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. तिरंगा हा संपूर्ण देशाचा अभिमान असून, धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र येण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

या रॅलीत सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शेख सलीमउद्दीन, हाजी शकूर बादशहा, सय्यद उमर, कामिल खान, काशिफ टेलर, अमान बिलाल, शफी ठेकेदार, इलियास नुरी, झुबेर रंगरेज, रईस रऊफ, रहीम कुरेशी, शेख सलमान, शाहरुख कुरेशी, अकबर इब्राहिम, नितीन शिंपी, अयान नवाब, नाझिम शेख, योगेश मराठे, रफिक रहमान, गुड्डू शब्बीर, मोहसीन कुरेशी, मुझफ्फर मास्टर, शुजात अली, अहेसान अली यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.

 


Protected Content

Play sound