यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामूहिक वनहक्क प्राप्त निमड्या, ता. रावेर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सामूहिक वनहक्क क्षेत्रात पर्यावरण संवर्धन, वनसंपदेचे संरक्षण आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला यावलचे DFO सौरव सहाय, रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा घाटगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे, रावेर गटविकास अधिकारी, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हा वनहक्क समन्वयक युनूस तडवी, CFR मॅनेजर भूषण कोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निमड्या गावचे सरपंच रतन बारेला, ग्रामसेवक दिनेश वळवी, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव, वन विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, रोहयो विभागातील APO कुणाल पाटील, CDEO दत्तू मांडवकर, CDEO भूषण शिरसाठ, ग्राम रोजगार सेवक महेश बारेला तसेच गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धन आणि वनांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत सामूहिक वनहक्क क्षेत्राचा योग्य पद्धतीने वापर आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ग्रामस्थांनीही वृक्षारोपणाला सकारात्मक प्रतिसाद देत लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. वनहक्क क्षेत्राचा उपयोग स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रशासन, वनविभाग, रोहयो विभाग, आदिवासी विकास विभाग आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेला हा वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निमड्या गावाने वृक्षसंवर्धनाचा संदेश देत ग्रामविकास आणि पर्यावरण रक्षणाची सांगड घातली.



