वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील भूमिगत गटार प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, नगरोत्थान योजनेत निधी उपलब्ध होत नसेल तर जागतिक बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मुरेफ’ योजनेतून प्रकल्प मंजूर करण्याची मागणी केली.
वरणगाव शहरासाठी सुमारे ८३ कोटी रुपयांचा भूमिगत गटार प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहरात सध्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी भूमिगत गटार प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शहरातील सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

“नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध होत नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत ‘मुरेफ’ योजनेतून वरणगावचा भूमिगत गटार प्रकल्प मंजूर करून द्यावा,” अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या लेखी सूचना दिल्याची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून प्रस्तावाची कार्यवाही जलदगतीने करून ‘मुरेफ’ योजनेतून प्रकल्प मंजूर करण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.
वरणगाव शहरातील नागरिकांना सांडपाणी व्यवस्थेच्या समस्येला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भूमिगत गटार प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शहराच्या स्वच्छता व मूलभूत नागरी सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असून, नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतरही काळे यांनी हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासोबत नगरसेवक नाना चौधरी, मिलिंद भैसे, अजमल खान, आकाश निमकर, मयूर गावंडे आणि फझल भाई उपस्थित होते.



