Home प्रशासन यावलच्या विस्तारित वसाहतीत धोकादायक लोंबकळणाऱ्या विद्युत तारा ; अपघाताची शक्यता 

यावलच्या विस्तारित वसाहतीत धोकादायक लोंबकळणाऱ्या विद्युत तारा ; अपघाताची शक्यता 

0
21

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील विस्तारित वसाहतींमध्ये रहदारीच्या मार्गावर विद्युत वाहिनीच्या तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या उंचीपासून कमी अंतरावर असलेल्या या तारांमुळे अवजड वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला असून, महावितरणने तातडीने या विद्युत तारांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी गंगानगरसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यावल शहरातील विस्तारित वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांसाठी उभारण्यात आलेले खांब योग्य नियोजनाअभावी अडचणीचे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उपलब्ध जागेनुसार विविध ठिकाणी विद्युत खांब उभारण्यात आले असून, त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारा देखील योग्य उंची आणि सुरक्षित अंतर न राखता टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही ठिकाणी या विद्युत तारा रस्त्याच्या मध्यभागी आणि वाहनांच्या मार्गाच्या तुलनेने कमी उंचीवरून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या चारचाकी तसेच अवजड वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः उंच वाहनांमुळे विद्युत तारांना धक्का लागण्याची किंवा तारा तुटण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गंगानगर परिसरातील एका रहदारीच्या मार्गावर ११ केव्ही थ्री-फेज उच्चदाब विद्युत वाहिनी जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या परिसरातील विविध विद्युत वाहिन्यांमध्ये आवश्यक ते सुरक्षित अंतर आहे का, याची तपासणी करून धोकादायक ठिकाणी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याच परिसरात सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका किंवा इतर उपक्रम आयोजित करताना लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे केवळ वाहतुकीपुरताच नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रमांच्या दृष्टीनेही या विद्युत वाहिन्यांचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे या तारांची स्थिती आणखी धोकादायक होण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी किंवा रहदारीच्या मार्गात आलेल्या विद्युत तारांची उंची वाढविणे, आवश्यक ठिकाणी खांबांचे स्थलांतर करणे तसेच विद्युत वाहिन्यांची सुरक्षित पद्धतीने पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने या संपूर्ण परिसराची तातडीने पाहणी करून धोकादायक विद्युत तारा आणि खांबांची माहिती संकलित करावी. त्यानंतर रहदारी, पादचारी आणि अवजड वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन विद्युत वाहिन्यांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी गंगानगर आणि यावल शहरातील विस्तारित वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.


Protected Content

Play sound