Home Cities अमळनेर कळमसरेत संत सावता माळी पुण्यतिथी जल्लोषात साजरी 

कळमसरेत संत सावता माळी पुण्यतिथी जल्लोषात साजरी 

0
38

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथे कर्म हीच पूजा मानणारे संत सावता माळी यांची पुण्यतिथी यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून माळी समाजासाठी सुमारे २० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन सभामंडपाचे लोकार्पणही मोठ्या थाटात करण्यात आले.

संत सावता माळी यांच्या विचारांना अभिवादन करत समाजबांधवांनी पुण्यतिथी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संत सावता माळी यांनी आपल्या आचरणातून श्रम, कर्तव्य आणि भक्तीचा संदेश समाजाला दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक एकोपा, शिक्षण आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. माळी समाजासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सभामंडपामुळे सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे २० लाख रुपयांच्या निधीतून साकारलेल्या या सभामंडपाचे लोकार्पण सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सभामंडपामुळे समाजबांधवांच्या विविध उपक्रमांना चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी माळी समाजातील विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजबांधवांचा गौरव केल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून समाजातील एकता, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. संतांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound