जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात संपत्तीच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादातून भावजईचा कुऱ्हाडीने खून केल्याप्रकरणी आरोपी दिराला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी दीपक लोटन सोनार याला जन्मठेपेसह १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात मृत महिलेचा मुलगा आर्यन सोनार हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आईच्या आठवणीने आर्यनला न्यायालयातच अश्रू अनावर झाले.
ही घटना २१ मे २०२१ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता जळगाव शहरातील मयूर कॉलनी, पिंप्राळा येथे घडली होती. आरोपी दीपक सोनार आणि त्याची भावजई योगिता मुकेश सोनार यांच्यात मिळकतीच्या कागदपत्रांवरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले आणि आरोपीने योगिता यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पार्श्वभूमी विम्याच्या रकमेसह घर व प्लॉटच्या मालकीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाची असल्याचे न्यायालयीन सुनावणीदरम्यान समोर आले. फिर्यादी आर्यन सोनार याचे वडील मुकेश सोनार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलाला मिळालेल्या विम्याच्या पैशांवरून आरोपी दीपक, त्याची आई प्रमिला लोटन सोनार आणि इतर नातेवाईकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप होता. तसेच मुकेश सोनार यांच्या मालकीचे घर व प्लॉट यावरूनही वाद सुरू होता.

घटनेच्या दिवशी रात्री आरोपी दीपक मिळकतीची कागदपत्रे एका सुटकेसमधून काढून लाकडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवत होता. त्यावेळी योगिता यांनी त्याला ‘दिपकभाऊ तुम्ही काय करता?’ असे विचारले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने ‘तुमचा काय संबंध?’ असे म्हणत घरातील हॉलमध्ये ठेवलेला दिवाण सरकवून त्याखालून कुऱ्हाड काढली आणि योगिता यांच्या डोक्यावर वार केला. हा प्रकार त्यांचा मुलगा आर्यन याच्या समोरच घडला. आईवर वार होत असल्याचे पाहून आर्यनने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने आरोपीच्या तोंडात हात घालून त्याचे गाल ताणले आणि त्याच्या हातातील कुऱ्हाड खेचून बाजूला फेकली. त्यानंतर आर्यन कुदळ आणण्यासाठी गेला. परत आल्यानंतर आरोपीने ‘सर्व संपले’ असे सांगितल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर आर्यनने मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. १०० क्रमांकावर संपर्क न झाल्याने त्याने मावशी, आत्या आणि आजी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी केला. तपास पूर्ण केल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आर्यन सोनार याची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच पंच साक्षीदार परेश शेळके, प्रणव यवतकर, सुदर्शन सपकाळे, शासकीय दस्तऐवज परीक्षक चंद्रकांत श्रावण बनसोड, शवविच्छेदन करणारे डॉ. एन. ए. देवराज आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी व उपलब्ध पुरावे सरकार पक्षाच्या बाजूने महत्त्वाचे ठरले.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी हिरालाल पाटील आणि केस वॉच पोलीस कॉन्स्टेबल इक्बाल पिंजारी यांनी सहकार्य केले. उपलब्ध साक्षी व पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती ए. एस. खडसे यांनी आरोपी दीपक लोटन सोनार याला जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा आईच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला आर्यन सोनार न्यायालयात उपस्थित होता. आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर आईच्या आठवणीने आर्यनला न्यायालयातच रडू कोसळले. या प्रसंगामुळे न्यायालय परिसरात काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले.



