Home Cities पारोळा १५ ऑगस्टपर्यंत रस्ते-पुलावरील खड्डे बुजवा ; अन्यथा मुंदाणे ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

१५ ऑगस्टपर्यंत रस्ते-पुलावरील खड्डे बुजवा ; अन्यथा मुंदाणे ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

0
15

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र. ऊ. परिसरात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तब्बल १७४ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर ११ दिवस उलटूनही रस्ते व पुलावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत असून, प्रशासनाने १५ ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण न केल्यास मुंदाणे फाट्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अतिवृष्टीमुळे मुंदाणे परिसरातील शेती, पिके, शेती उपयोगी साहित्य, रस्ते, पूल, विद्युत पोल तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीची पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार ॲड. अमोल पाटील तसेच तहसीलदार उल्हास देवरे यांनी दखल घेत घटनास्थळी पाहणी केली होती. नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच रस्त्यांची दुरुस्ती आणि तामसवाडी-मुंदाणे गावाला जोडणाऱ्या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मात्र, वरिष्ठ पातळीवरून सूचना देऊनही प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्ते आणि पुलावर पडलेले मोठमोठे खड्डे अद्याप ‘जैसे थे’ असून, पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी केवळ दिखाव्यासाठी एक-दोन डंपर माती टाकण्यात आली. मात्र, मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक अद्याप धोकादायक आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

रस्त्याची दुरवस्था झाल्याचा फटका एसटी बससेवेलाही बसला आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित प्रवास करता न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तरीही संबंधित विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी किंवा दुरुस्तीच्या कामासाठी गावात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशांनाही संबंधित यंत्रणेकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, रस्ते व पुलावरील खड्डे १५ ऑगस्टपर्यंत बुजवून दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अन्यथा मुंदाणे फाट्यावर ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात माजी सरपंच डी. के. पाटील, सरपंच सुलाबाई रोहिदास पाटील, उपसरपंच राजकुमार पाटील, शरद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तामसवाडी-मुंदाणे जोडणाऱ्या पुलावर आणि रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. भविष्यात या मार्गावर कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाचे कर्मचारी व प्रशासनाची राहील, असा इशारा उपसरपंच राजकुमार पाटील यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound