Home Cities जळगाव जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव १३ ऑगस्टला ; जळगावकरांना मिळणार अस्सल रानभाज्यांची मेजवानी

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव १३ ऑगस्टला ; जळगावकरांना मिळणार अस्सल रानभाज्यांची मेजवानी

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग आणि जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी क्लब ऑफ वेस्ट येथे हा महोत्सव होणार असून, नागरिकांना विविध अस्सल रानभाज्या आणि त्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. रानभाज्यांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली विविध जीवनसत्वे, खनिजे, पौष्टिक घटक तसेच औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे पारंपरिक आहारातील या नैसर्गिक संपदेचे महत्त्व नागरिकांना समजावे, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील शेतकरी या महोत्सवात करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्ड, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग यांसह विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना ग्रामीण व जंगल परिसरात मिळणाऱ्या अस्सल रानभाज्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

याशिवाय शेतकरी आणि विविध गटांच्या माध्यमातून रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले पारंपरिक खाद्यपदार्थही महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. रानभाज्यांची ओळख, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व तसेच त्यापासून तयार होणाऱ्या विविध पाककृतींबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय महोत्सवासोबतच ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तालुकास्तरावरही सप्ताहाच्या स्वरूपात रानभाजी महोत्सव राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना रानभाज्यांची विक्री करण्यासाठी स्थानिक पातळीवरही व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

रानभाज्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व स्थानिक गटांना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देतानाच नागरिकांना पौष्टिक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. विशेषतः बदलत्या जीवनशैलीच्या काळात पारंपरिक आहारपद्धतीतील पौष्टिक घटकांकडे पुन्हा लक्ष वेधण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी उपलब्ध रानभाज्यांच्या मालाचा तपशील घेऊन संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी १३ ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगा येथे भेट देऊन रानभाज्यांची खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound