Home Cities पारोळा शिवसेना ठाकरे गटाची एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग

शिवसेना ठाकरे गटाची एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग

0
1

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत बूथपातळीपर्यंत संघटना मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील सौंडकर यांच्या दौऱ्यात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक स्तरावर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यावर भर देण्यात आला. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथपातळीवरील संघटन अधिक सक्षम करणे, स्थानिक पातळीवरील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि पक्षाची विचारधारा व भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जळगाव लोकसभा संघटक करण पाटील यांच्या वतीने एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनील सौंडकर यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पक्षाची संघटनात्मक भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रा. आर. बी. पाटील (तालुकाप्रमुख, पारोळा), दौलत नाना पाटील (विधानसभा क्षेत्रप्रमुख), रवि चौधरी (एरंडोल तालुकाप्रमुख), बाळासाहेब पाटील (उपतालुकाप्रमुख), हिरामण पाटील (विभागप्रमुख), अशोक भाऊ मराठे (शहरप्रमुख), सनी लोहार (युवक शहरप्रमुख), तुषार देवरे (वाहतूक सेना प्रमुख), अरुण चौधरी (संचालक, विकास सोसायटी) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound