पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहराचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी महाराज संस्थानच्या पारंपरिक ब्रह्मोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. शेकडो वर्षांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या या ब्रह्मोत्सवानिमित्त पारोळा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. ११ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक विधी, कीर्तन, भक्तिसंगीत, श्रींच्या विविध वाहनांवरील मिरवणुका, पालखी सोहळा आणि विशेष आकर्षण असलेला २२ ऑक्टोबरचा भव्य रथोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी महाप्रसाद व काढ्याच्या कार्यक्रमाने ब्रह्मोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव हा पारोळा शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या काळात दररोज श्रींचे विविध वाहनांवरून वहन काढण्यात येते. प्रत्येक वहनाच्या पूजेचा मान निश्चित मानकऱ्यांना दिला जातो. या परंपरेतून भाविकांची श्रद्धा, सामाजिक सहभाग आणि पिढ्यान्पिढ्या जपला गेलेला धार्मिक वारसा अधोरेखित होतो. यंदाच्या ब्रह्मोत्सवासाठी संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी ध्वजवहनाने ब्रह्मोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ध्वजवहन पूजेचे मानकरी चंद्रकांत एकनाथ शिरोळे आणि सौ. धनश्री डॉ. स्वप्नील चंद्रकांत शिरोळे हे आहेत. रात्री ९ ते ११ या वेळेत बेलदारवाडी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांच्या हस्ते गरुडस्तंभ पूजन करण्यात येणार आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी नागाचे वहन निघणार असून, पतंगराव वना पाटील आणि सुभाष फत्तू जाधव हे पूजेचे मानकरी असतील. रात्री ९ ते ११ या वेळेत सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी येथील ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर यांचे कीर्तन होईल. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी चंद्राचे वहन निघणार असून, सुमीत प्रभाकर पाटील आणि किशोर विजय पाटील हे पूजेचे मानकरी असतील. या दिवशीही डॉ. जयंत करंदीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी मोराचे वहन निघेल. शुभम नंदू सोनजे आणि प्रसाद गोकुळ महाजन यांच्या हस्ते वहनपूजा होणार आहे. रात्री ‘अंगणी पारिजात फुलला’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. धुळे येथील पारिजात चव्हाण हे या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी वाघाचे वहन निघणार असून, दीपक चतुर गिरासे आणि हिमालय संजय मोराणकर हे पूजेचे मानकरी असतील. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी घोड्याचे वहन निघेल. रोहन राजेंद्रशेठ कासार आणि तेजस प्रमोदशेठ कासार यांच्या हस्ते वहनपूजा होणार आहे.
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी ब्रह्मोत्सवातील सप्तमी पालखी आणि हत्तीच्या वहनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ७ वाजता सप्तमीची पालखी निघून स्मशानभूमीतील कै. गिरीशेठ शिंपी यांच्या स्मारकाजवळील छत्रीपर्यंत जाईल. सायंकाळी ७ वाजता हत्तीचे वहन निघेल. मानव राजेंद्र मोरे आणि दिग्विजय प्रभाकर देवरे हे वहनपूजेचे मानकरी असतील. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी कल्पतरूचे वहन निघणार आहे. साईराज प्रमोद पवार आणि सौ. स्वाती व लक्ष्मण काशिनाथ वाणी सर हे पूजेचे मानकरी असतील. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सूर्याचे वहन निघेल. शिरीष अशोक पाटील आणि अविनाश हणमंतराव पवार यांच्या हस्ते वहनपूजा होईल. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी मारुतीचे वहन निघणार असून, प्रितेश राजेंद्र चौधरी आणि अॅड. श्रीप्रसाद अशोक पुराणिक हे पूजेचे मानकरी असतील.
बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी गरुडाचे वहन निघणार आहे. संस्थानचे विश्वस्त डॉ. नंदकिशोर दत्तात्रय सैंदाणे, डॉ. सूरज राजेंद्र कोठावदे आणि नगरसेवक पंकज राजेंद्र मराठे हे वहनपूजेचे मानकरी असणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या भव्य रथोत्सवाची भाविकांना प्रतीक्षा असेल. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध एकादशीला श्री बालाजी महाराजांचा भव्य रथोत्सव साजरा होणार आहे. ब्रह्मोत्सवातील हा सर्वाधिक आकर्षणाचा आणि महत्त्वाचा सोहळा मानला जातो. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रथाच्या पूजेचा मान जलसंपदा, कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन आणि जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधना गिरीष महाजन यांना देण्यात आला आहे.
रथोत्सवाच्या दिवशी श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी पारोळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भव्य रथाचे दर्शन, धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता असणार आहे. पारोळ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेला हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम ठरणार आहे. रथोत्सवानंतरही धार्मिक कार्यक्रमांची मालिका सुरू राहणार आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी अंगदाचे वहन निघेल. नगरसेवक मनिष भाईदास पाटील, नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार आणि बालाजी स्वयंसेवक राहुल संतोष चौधरी हे पूजेचे मानकरी असतील. शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी इंद्रसभेचे वहन निघणार असून, उद्योगपती किरण पुंजूशेठ वाणी आणि अमृत साडी सेंटरचे प्रफुल केशव क्षत्रिय यांच्या हस्ते वहनपूजा होईल.
सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राहुल श्रीकृष्ण भोसले, सौ. मनिषा भानुदास शिंदे आणि शुभम दगडूशेठ कासार हे पालखीपूजेचे मानकरी असतील. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी महाप्रसाद आणि काढ्याच्या कार्यक्रमाने ब्रह्मोत्सवाची सांगता होईल. श्री बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सवासाठी संस्थानच्या वतीने आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी आणि रावसाहेब भोसले यांनी दिली. यावेळी संस्थानचे विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, प्रकाश शिंपी, अरुण वाणी, केशव क्षत्रिय, संजय कासार, चंदू शिंपी, दिलीप शिरुडकर आणि प्रमोद शिरोळे यांच्यासह विश्वस्त मंडळ व समितीचे सदस्य उपस्थित होते.



