मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर महावितरण विभागांतर्गत ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे करणाऱ्या माऊली इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर महावितरण प्रशासनाने चौकशी केली आहे. या प्रकरणातील त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल विभागीय कार्यालयाला प्राप्त झाला असून, संबंधित ठेकेदाराची कामे २ जुलैपासून बंद करण्यात आली आहेत. ठेकेदारावर अहवालातील निष्कर्षांच्या आधारे नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जळगाव येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मुक्ताईनगर विभागातील ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांमध्ये माऊली इन्फ्रास्ट्रक्चरचे ठेकेदार उमेश बंबाटकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुशील शुक्ला, उपकार्यकारी अभियंता यशपाल सोनवणे आणि लेखाधिकारी राहुल इंगळे यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीने संबंधित कामांची चौकशी करून अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर केला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर २ जुलैपासून संबंधित ठेकेदाराची ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे बंद करण्यात आल्याची माहिती मुक्ताईनगर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण यांनी दिली. समितीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथील अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठेकेदारामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये नेमक्या कोणत्या बाबींमध्ये अनियमितता झाली, याबाबत स्पष्टीकरण मागविण्यासाठी सहाय्यक अभियंते अजय तडवी, आशिष कुंभारे, अनिमेष काळे, श्रीकृष्ण बुरकूल आणि योगेश शेकोकार यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी चार अभियंत्यांनी नोटिसांना लेखी उत्तरे दिली आहेत. सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण बुरकूल यांचे उत्तर पोस्टाद्वारे ६ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.
सर्व संबंधित कारणे दाखवा नोटिसांची उत्तरे तसेच त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथील अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ ठेकेदाराचीच नव्हे, तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते का, याकडेही आता लक्ष लागले आहे. ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांमध्ये जीर्ण विद्युत तारा बदलणे, वाकलेले विद्युत खांब बदलणे, एबी स्विच बसविणे, ट्रान्सफॉर्मरच्या जुन्या केबल बदलणे, तुटलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात. या कामांचा थेट संबंध शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याशी आहे. त्यामुळे या कामांमध्ये दर्जा, मोजमाप अथवा प्रत्यक्ष कामाबाबत कोणतीही तफावत असल्यास त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
चौकशीमुळे महावितरणच्या मेंटेनन्स निधीचा योग्य वापर झाला का, प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामांमध्ये आणि कागदोपत्री नोंदींमध्ये तफावत आहे का, कामांची गुणवत्ता आणि मोजमाप यांची योग्य तपासणी झाली का, यांसारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालातील नेमके निष्कर्ष अद्याप अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. आता या अहवालाच्या आधारे संबंधित ठेकेदारावर करारातील अटी व महावितरणच्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई होते का, ठेका रद्द अथवा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कार्यवाही केली जाते का, तसेच गंभीर अनियमितता सिद्ध झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस होते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर संबंधित अभियंत्यांची जबाबदारी निश्चित झाल्यास त्यांच्यावरही कोणती कारवाई केली जाते, याकडे महावितरण कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष आहे.
महावितरणच्या निधीतून होणारी मेंटेनन्सची कामे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने होणे आवश्यक आहे. विद्युत सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये निष्काळजीपणा किंवा तडजोड झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवितासह वीजपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे चौकशी अहवालातील प्रत्येक बाबीची सखोल पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने आता माऊली इन्फ्रास्ट्रक्चरचे ठेकेदार उमेश बंबाटकर यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते, तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते का, याकडे मुक्ताईनगरचे लक्ष लागले आहे.



