Home Cities अमळनेर कळमसरे मार्गे धावणारी चोपडा–नंदुरबार बससेवा पूर्ववत सुरू करा; प्रवाशांची मागणी

कळमसरे मार्गे धावणारी चोपडा–नंदुरबार बससेवा पूर्ववत सुरू करा; प्रवाशांची मागणी

0
20

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर–मारवड–कळमसरे–शहापूर मार्गे धावणारी चोपडा–नंदुरबार एसटी बससेवा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काही तांत्रिक व अपरिहार्य कारणांमुळे ही बससेवा बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी आता ती पूर्वीच्या वेळापत्रकानुसार तातडीने सुरू करावी, अशी मागणी कळमसरेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून चोपडा–नंदुरबार बससेवा कोणताही मोठा व्यत्यय न येता नियमित सुरू होती. त्यामुळे कळमसरेसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. मात्र, यंदाची पंढरपूर यात्रा सुरू झाल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव ही बससेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावातील बसथांब्यावर वेळेवर बस न आल्याने अनेक प्रवाशांना अखेर माघारी फिरावे लागत आहे. विशेषतः नंदुरबारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नातेवाईकांच्या भेटीगाठी, व्यावसायिक कामे तसेच बाजारपेठेतील व्यवहारांसाठी नागरिकांना थेट नंदुरबारपर्यंत पोहोचण्याची सुविधा या बसमुळे मिळत होती.

चोपडा आगाराला चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी ही बससेवा अचानक बंद का करण्यात आली, असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीलाही वाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याबरोबरच आगाराच्या उत्पन्नाच्या दृष्टीनेही ही बससेवा पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चोपडा–नंदुरबार बसमुळे कळमसरे व परिसरातील नागरिकांना एकाच दिवसात नंदुरबारपर्यंत जाऊन आपली कामे पूर्ण करून परत येणे शक्य होते. नंदुरबारमार्गे गुजरात तसेच मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही बस उपयुक्त ठरत होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बस पूर्वीच्या वेळेतच नियमित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कळमसरेसह पंचक्रोशीतील गावकरी ग्रामपंचायत स्तरावर चोपडा आगाराला निवेदन देणार असल्याची माहिती आहे. तसेच खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound