जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय हातमाग परंपरेचे जतन व संवर्धन तसेच विद्यार्थिनींमध्ये स्वदेशी उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध कलाकृती आणि वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले.
राष्ट्रीय हातमाग दिन दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. भारताच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेसोबतच देशभरातील विणकर आणि हातमाग कारागिरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नयना झोपे आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमानिमित्त विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या बांधणीच्या साड्या, हातमागावर तयार केलेल्या विविध साड्या, आकर्षक रांगोळ्या तसेच ज्वेलरी आदी वस्तूंचे सुंदर प्रदर्शन मांडले. विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला आणि कलाकुसरीला या प्रदर्शनातून व्यासपीठ मिळाले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध वस्तूंमधून भारतीय हातमाग परंपरेचे सौंदर्य, वैविध्य आणि कारागिरांचे कौशल्य प्रभावीपणे अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना पारंपरिक कला समजून घेण्यासोबतच स्वदेशी उत्पादनांचे महत्त्वही समजते. तसेच स्थानिक कारागीर आणि पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते, असे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व, भारतीय विणकरांचे योगदान तसेच हातमाग उद्योगासमोरील विविध संधी आणि आव्हाने याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करून स्थानिक कारागिरांना आणि उद्योगांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. कीर्ती पाटील आणि प्रा. डॉ. ललिता सपकाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, ग्रंथपाल सौ. कविता भोरटेकर, प्रा. कोमल भालेराव तसेच एन.एस.एस. ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.



