Home धर्म-समाज जुने मुक्ताई मंदिर कोथळी मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी

जुने मुक्ताई मंदिर कोथळी मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी

0
25

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील संत गजानन महाराज मंदिराजवळून जुने मुक्ताई मंदिर, कोथळी येथे जाणाऱ्या मुख्य मार्गावर भव्य ‘आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर प्रवेशद्वार (कमान)’ उभारण्यात यावे, अशी मागणी समस्त भाविक, वारकरी संप्रदाय व नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. संत मुक्ताईंच्या पावन पालखीच्या आगमनापूर्वी या प्रवेशद्वाराच्या उभारणीचे भूमीपूजन करण्यात यावे, अशीही अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.

श्री. लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीमार्फत शहरातील विविध ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वारे उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, देशभरातील तसेच विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुने मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अद्याप भव्य प्रवेशद्वार नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

भाविकांच्या मते, आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराकडे येणाऱ्या भाविकांचे स्वागत भव्य प्रवेशद्वारातून झाल्यास तीर्थक्षेत्राचे वैभव अधिक वृद्धिंगत होईल. तसेच मुक्ताईनगरची धार्मिक ओळख अधिक प्रभावीपणे देशभरात पोहोचण्यास मदत होईल. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आदिशक्ती संत मुक्ताईंची पावन पालखी येत्या १८ तारखेला मुक्ताईनगर येथे आगमन करणार आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वार उभारणीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आल्यास वारकरी संप्रदाय, भाविक आणि नागरिकांसाठी तो अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

भाविकांनी प्रशासनाला भुसावळ रोड ते जुने कोथळी मुक्ताई मंदिर मार्गावरील मुक्ताई झेरॉक्सलगतच्या जागेवर भव्य प्रवेशद्वार उभारणीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी देऊन विकासकामाला गती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. या मागणीच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जळगाव, मुख्यमंत्री कार्यालय (CMO), महाराष्ट्र शासन तसेच नगर विकास संचालनालय यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. धार्मिक पर्यटनाला चालना देणारी आणि संत मुक्ताईंच्या तीर्थक्षेत्राचे वैभव वाढविणारी ही मागणी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून मान्य करावी, अशी अपेक्षा वारकरी संप्रदाय, भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound