Home Cities यावल भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हा उपाध्यक्षपदी यावलचे सतीश कोळी यांची...

भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हा उपाध्यक्षपदी यावलचे सतीश कोळी यांची नियुक्ती

0
20

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या जळगाव जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये यावल येथील सामाजिक व पक्ष संघटनेत सक्रिय असलेले सतीश रामा कोळी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव पूर्व क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा (पूर्व) अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराज होळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जमाती मोर्चाच्या जळगाव जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची घोषणा केली. ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष हरिलाल रमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली.

या नव्या कार्यकारिणीत यावलचे सतीश रामा कोळी यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय राहून अनुसूचित जमाती समाजातील विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीमुळे संघटनात्मक बळकटी मिळेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सतीश कोळी यांच्या निवडीचे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, उद्योगमंत्री ना. संजय सावकारे, रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार राजू मामा भोळे, आमदार नंदुभाऊ महाजन यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांनी स्वागत केले आहे. आगामी काळात अनुसूचित जमाती समाजाशी संबंधित संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

 जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सतीश कोळी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनुसूचित जमाती समाजाच्या विकासासाठी आणि पक्ष बळकटीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound