Home Cities अमळनेर ‘ज्ञानदीप अभियान’ अंतर्गत १,००० गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन

‘ज्ञानदीप अभियान’ अंतर्गत १,००० गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन

0
12

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत DL Social Foundation च्या अधिकृत शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा भवन, स्वामी नारायण मंदिरामागे, स्टेशन रोड, अमळनेर येथे करण्यात आले आहे. संस्थेच्या शुभारंभानिमित्त ‘ज्ञानदीप अभियान’ या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाची सुरुवात होणार असून, अमळनेर तालुक्यातील १,००० आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

‘शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ज्ञानदीप अभियानाचा उद्देश आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची प्रेरणा निर्माण करणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

DL Social Foundation ने समाजहित, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन तसेच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था विविध योजनांद्वारे कार्यरत राहणार असून, भविष्यातही अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

संस्थेचे संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका सौ. भावना मैराळे यांनी अमळनेर तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या शुभारंभ सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी शैक्षणिक मदतीसाठी DL Social Foundation शी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. पात्र विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ देण्यासाठी फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound