नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नशिराबाद येथील उपकेंद्र क्रमांक १ मध्ये ‘कुष्ठरुग्ण सहवासित तपासणी कार्यक्रम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा उद्देश मागील पाच वर्षांत (सन २०२१ ते २०२६) परिसरात आढळलेल्या कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून कुष्ठरोगाचा प्रसार रोखणे हा आहे.
या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत सर्वेक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याचे मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ. स्नेहा कोलते यांनी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या सहवासित तपासणीची माहिती घेतली. कुष्ठरोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास त्यावर पूर्णपणे उपचार शक्य असून, वेळेत उपचार घेतल्यास शरीरातील संभाव्य विकृती टाळता येतात. त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य पथकाने नशिराबाद परिसरातील विविध कुटुंबांना भेटी देऊन संशयित लक्षणांची प्राथमिक तपासणी केली. तसेच नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती देत गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

या सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सुनील ढाके, दीपक तायडे, संदेश महाजन तसेच आशा सेविका सुवर्णा पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती द्यावी आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



