Home प्रशासन जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावलमध्ये रानभाज्या मेळावा; महिला बचत गटांना व्यासपीठ

जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावलमध्ये रानभाज्या मेळावा; महिला बचत गटांना व्यासपीठ

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल कार्यालयातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रानभाज्या मेळावा, महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, यशोगाथा सादरीकरण तसेच गुणवंत विद्यार्थी आणि यशस्वी लाभार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या मेळाव्याचा मुख्य उद्देश स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या पारंपरिक, पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. यापूर्वी प्रकल्प कार्यालयामार्फत महिला बचत गटांना मोहफुलापासून विविध पदार्थ निर्मिती, सोलर ड्रायरद्वारे फळांची पावडर तयार करणे तसेच आदिवासी वारली पेंटिंग उद्योगासाठी अर्थसहाय्य देण्यात आले असून, त्या उत्पादनांचे स्टॉलही मेळाव्यात उभारण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात ‘राणी दुर्गावती योजना’ अंतर्गत लाभ घेतलेल्या पाच महिला लाभार्थी आपल्या यशोगाथा आणि मनोगत मांडणार आहेत. तसेच सन २०२५-२६ मधील यशस्वी लाभार्थ्यांचा गौरव करण्यात येईल. इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय आदर्श आश्रमशाळा, आदर्श वसतिगृह, गृहपाल, मुख्याध्यापक, अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरवही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत अर्थसहाय्य मिळालेल्या सर्व महिला लाभार्थी व महिला बचत गटांच्या सदस्यांनी आपल्या उत्पादनांचे स्टॉल लावून या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण प्रभाकर पवार यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील महिलांना स्वावलंबनाची नवी संधी मिळण्यासोबतच पारंपरिक ज्ञान, स्थानिक उत्पादने आणि पोषक रानभाज्यांचे महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound