Home Cities पारोळा योग, पर्यावरण आणि औषधी वनस्पतींचा संगम; पारोळ्यात ‘जडीबुटी दिवस’ उत्साहात साजरा

योग, पर्यावरण आणि औषधी वनस्पतींचा संगम; पारोळ्यात ‘जडीबुटी दिवस’ उत्साहात साजरा

0
9

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । परम पूज्य आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त पारोळ्यात “जडीबुटी दिवस” विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. साने गुरुजी कॉलनी योग समिती, पतंजली योग समिती आणि अभंग प्रतिष्ठान, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी गार्डन येथे योग शिबिर, औषधी वनस्पती लागवड आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा लाभ घेतला. नियमित योगाभ्यासामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधला जात असून निरोगी व आनंदी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचे पतंजलीचे पूर्णकालीन योगशिक्षक प्रा. विकास सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यानंतर संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या अभंगातून प्रेरणा घेत तुळस, पुदिना, गवती चहा, कोरफड आदी विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी प्रत्येक घरासमोर किमान एक औषधी वनस्पती आणि एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संरक्षणासोबतच औषधी वनस्पतींचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक बारकू गुरुजी, राजेंद्र परदेशी, सुभाष पाटील सर, आर. एल. पाटील, योग शिक्षिका मनीषा पाटील, योगिता मालपुरे, शोभा दिलीप पाटील, भोकरे ताई, ॲड. कृतिका आफ्रे, पोलीस पाटील ललिता पाटील, विजया सोनवणे, पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग, पर्यावरण संवर्धन आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व यांचा प्रभावी संदेश देत पारोळ्यातील ‘जडीबुटी दिवस’ प्रेरणादायी वातावरणात उत्साहात साजरा झाला.


Protected Content

Play sound