जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराबाहेरील तरसोद–पाळधी बायपास मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी संबंधित पूल व बायपास रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
पक्षाच्या निवेदनानुसार, गेल्या शुक्रवारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही बाब वेळेत लक्षात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव संपूर्ण बायपास मार्ग बंद करण्यात आल्याने सर्व वाहने शहरातून वळविण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

खोटेनगर, पिंपराळा, शिव कॉलनी, प्रभात कॉलनी, रिंग रोड, महाबळ कॉलनी, सिंधी कॉलनी, मेहरून, सुप्रीम कॉलनी, अयोध्या नगर आदी भागांतील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यातही अडचणी निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनात स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे. विविध पथके येणार असल्याच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात पूल दुरुस्तीचे काम सुरू झालेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये पूल दुरुस्तीसाठी आणखी १५ ते २० दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन पूल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्यालय जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव पाचवणे, रमेश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बायपास मार्ग शक्य तितक्या लवकर सुरू करावा, अशी मागणी आता नागरिकांसह विविध संघटनांकडूनही होत असून, प्रशासन यावर किती वेगाने निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



