Home Cities अमळनेर “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरला मंत्री गिरीष महाजनांचा दिलासा

“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरला मंत्री गिरीष महाजनांचा दिलासा

0
11

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पूरग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पूर्वीच्या निकषानुसार दिली जाणारी पाच हजार रुपयांची तातडीची मदत वाढवून आता प्रत्येक पात्र पूरग्रस्ताला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना धीर दिला.

महापुरामुळे अमळनेर शहरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीष महाजन यांनी हेडावे नाका, पारोळा रोड, पैलाड परिसर, मरीमाता चौक आणि मातंगवाडा येथे भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या महिलांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी नागरिकांना धीर देत, “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणताही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. पंचनामे तातडीने पूर्ण करून मदत जलदगतीने दिली जाईल,” अशी ग्वाही दिली.

शहराचा मुख्य पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुरात वाहून गेल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नवीन जलवाहिनी उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी)च्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन शहराचा पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना निवेदन देऊन महापुरात चार फोटोग्राफरांची दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे कॅमेरे, संगणक, प्रिंटर आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य निकामी झाल्याचे सांगत विशेष आर्थिक मदतीची मागणी केली. यानंतर मंत्र्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुरामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. तसेच बाजार समितीच्या मागील संरक्षण भिंत कोसळल्याने झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले. यावर मंत्री गिरीष महाजन यांनी व्यापाऱ्यांनाही शक्य तितकी मदत मिळावी यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री गिरीष महाजन यांनी तातडीच्या मदतीची रक्कम पाच हजारांवरून दहा हजार रुपये करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच शेती, घरे, जमीन वाहून जाणे, जनावरे दगावणे आणि इतर सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक पात्र आपत्तीग्रस्तापर्यंत शासनाची मदत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूरस्थितीची कारणे दूर करण्यासाठीही त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांमुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत असेल तर संबंधित अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या दौऱ्यात मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पारदर्शक आणि जलदगतीने पूर्ण करून शासनाची मदत त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दौऱ्यादरम्यान जयनिल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुराच्या दिवशी जीवाची पर्वा न करता अनेक नागरिकांचे प्राण वाचवले, पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवले तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने अन्न व पिण्याचे पाणी पुरवल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. या कार्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष कौतुक करत अध्यक्ष गौतम पाटील, सर्व स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचे अभिनंदन केले.

पूरग्रस्तांना धीर देत आमदार अनिल पाटील यांनीही शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासह शासनाच्या सर्व योजना आणि आर्थिक मदत वेळेत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. 


Protected Content

Play sound