Home Cities यावल धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचा यशस्वी समारोप

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचा यशस्वी समारोप

0
11

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास” कार्यशाळेचा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी समारोप झाला. स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी शाखा जळगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

दि. २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून प्रभावी संवादकौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध जीवनशैली ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावरही सातत्याने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यशाळेदरम्यान मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक सुजाता दळवी यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविणे, प्रभावी संवादकौशल्य, मुलाखत तंत्र, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, तणाव व्यवस्थापन, टीमवर्क, ग्रहणक्षमता वाढविण्याचे उपाय तसेच करिअर नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विविध प्रात्यक्षिके, गटचर्चा, सादरीकरणे, प्रेरणादायी उपक्रम आणि सहभागात्मक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जीवनात अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज असून, हसत-खेळत परीक्षा देण्याची मानसिकता तयार करावी, प्रत्येक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावावी, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपली कौशल्ये सादर केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास, प्रभावी संवाद साधण्यास, संघभावना विकसित होण्यास तसेच नेतृत्वगुण वृद्धिंगत होण्यास मोठी मदत झाली. सहभागी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समारोप समारंभात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करत व्यक्तिमत्त्व विकास हा शैक्षणिक आणि व्यावसायिक यशाचा महत्त्वाचा पाया असल्याचे सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णवी पाटील, सुरजकुमार ठाकूर, कुलदीप महाजन, दीपलव शिंदे तसेच हेमाताई चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि आयोजन समितीच्या संयुक्त प्रयत्नातून कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.


Protected Content

Play sound