यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजपरिवर्तनाची प्रेरणा दिली असून त्यांच्या लेखणीत जग बदलण्याची धमक होती, असे प्रतिपादन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे इतिहास विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड आणि उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रत्नाकर कोळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक योगदानाचा सखोल आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रा. रत्नाकर कोळी यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव” या लोकप्रिय रचनेचा उल्लेख करत त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचे महत्त्व अधोरेखित केले. कादंबरी, कथा, वगनाट्य, प्रवासवर्णन, नाटक, पोवाडे, लावणी आणि छक्कड अशा विविध साहित्यप्रकारांमधून त्यांनी श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले. “ही पृथ्वी शेषनागाच्या फणावर नसून श्रमिक-कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेलली आहे,” या त्यांच्या विचारांचा उल्लेख करत प्रा. कोळी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांच्या मोलाच्या योगदानावरही प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. एम. डी. खैरनार यांनी अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे प्रणेते असल्याचे सांगत त्यांच्या साहित्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याचा गौरव करत “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या ऐतिहासिक घोषणेचा उल्लेख केला. लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि संघर्षशील विचार आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रा. डॉ. संतोष जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पंकज बोदडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अरुण पावरा यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पवार, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. भागवत पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील प्रभाव आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेमाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.



