Home Cities जळगाव पावसाने उद्ध्वस्त मेहरूण; समाजवादी पक्षाचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाने उद्ध्वस्त मेहरूण; समाजवादी पक्षाचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

0
22

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण वॉर्ड क्रमांक १७ मधील लक्ष्मी नगर, दत्त नगर आणि पीरजादे वाडा परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नवनियुक्त महानगर अध्यक्ष सलीम इनामदार यांनी आपल्या पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कार्यदौरा केला. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या पाहणी दौऱ्यात उत्तर महाराष्ट्र प्रभारी रईस कुरेशी आणि समाजवादी पक्षाचे महानगर प्रधान सचिव इम्रान साहिल हेही सहभागी झाले होते. लक्ष्मी नगरमधील दत्त नगर परिसरात, मदरसा अन्वरुल उलूमच्या मागील भागात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. परिसरातील नागरिकांनी पावसामुळे होणाऱ्या हालअपेष्टांची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. मुसळधार पावसामुळे परिसरातील कच्च्या नाल्याचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, फर्निचर तसेच विद्युत उपकरणे पाण्यामुळे खराब झाली असून अनेक घरांतील रेफ्रिजरेटर बंद पडले आहेत. रात्रभर पाणी घरात शिरत राहिल्यामुळे नागरिकांना झोपही घेता आली नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. सरकार आणि प्रशासनाकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या परिसरातील उघड्या नाल्यामुळे जीवितासही धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात चार लहान मुले नाल्याच्या पाण्यात वाहून जाण्याची वेळ आली होती. मात्र, स्थानिक नागरिक किफायत अली बागबान यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरातील धोकादायक परिस्थिती अधोरेखित झाली आहे.

रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या मोठ्या पाईपजवळील तुटलेली आणि अरुंद पायवाट नागरिकांसाठी आणखी धोकादायक ठरत आहे. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक कोणत्याही क्षणी गटारात पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इमारतीखालून वाहणारे सांडपाणी घरांच्या पायाभूत संरचनेलाही धोका निर्माण करत असून अनेक घरांच्या भिंती कमकुवत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.  सलीम इनामदार यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून जळगाव महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागातील समस्यांकडे तातडीने लक्ष वेधले जाणार आहे. नाले, रस्ते आणि जलनिस्सारण व्यवस्थेची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. आवश्यकता भासल्यास लक्ष्मी नगरातील नागरिकांसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी सलीम इनामदार, रईस कुरेशी आणि इम्रान साहिल यांनी लक्ष्मी नगर तसेच पीरजाडे वाडा परिसरातील नाले आणि पुलांचीही पाहणी केली. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. या दौऱ्यात अफसर भाई, किफायत भाई, नवीद पीरजादे यांच्यासह लक्ष्मी नगर परिसरातील अनेक रहिवासी उपस्थित होते.


Protected Content

Play sound