पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील भोलाणे गावात संततधार पावसामुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरात शिरणारे पावसाचे पाणी रोखण्याचा प्रयत्न करत असताना कच्च्या भिंतीचा काही भाग अचानक कोसळून प्रकाश अर्जुन करंजे (वय ६५) या वृद्ध शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सततच्या मुसळधार पावसामुळे जीर्ण आणि कच्च्या घरांचा वाढता धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३१) सकाळपासून पारोळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे प्रकाश करंजे यांच्या घरामागील नाल्याचे पाणी घरात शिरू लागले होते. त्यामुळे घराचे नुकसान होऊ नये म्हणून सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास ते नाल्याजवळ साचलेला कचरा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, पावसामुळे आधीच कमकुवत झालेल्या कच्च्या भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. भिंतीचे दगड थेट प्रकाश करंजे यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्रकाश करंजे हे भोलाणे गावातील कष्टाळू, शांत स्वभावाचे आणि सर्वपरिचित शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून, नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती कांतीलाल करंजे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार कैलास साळुंखे करीत असून, घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जीर्ण, कच्च्या किंवा धोकादायक अवस्थेतील घरांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करताना किंवा पूरस्थितीत अनावश्यक धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



