Home क्राईम यावलमध्ये सागवान तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार ; कोरपावलीत साग चौपट व दुचाकीसह...

यावलमध्ये सागवान तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार ; कोरपावलीत साग चौपट व दुचाकीसह 42 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
52

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली शिवारात यावल पश्चिम वनविभागाने धडक कारवाई करत सागवानाची अवैध वाहतूक उधळून लावली. या कारवाईत सागवानाचे चौपट आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, वनरक्षकांचा पाठलाग चुकवत आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टच्या रात्री यावल पश्चिम वनक्षेत्रातील वनरक्षकांचे पथक हरिपुरा–कोरपावली ते यावल मार्गावर गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथकाने सापळा रचला होता. दरम्यान, सागवानाच्या चौपटाची वाहतूक करणारा एक दुचाकीस्वार त्या मार्गावरून येताना दिसला. वनरक्षकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने वाहनाचा वेग वाढवून पळ काढला.

वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला. मात्र, आरोपीने वनविभागाच्या कारवाईची चाहूल लागताच दुचाकी आणि सागवानाचे चौपट घटनास्थळी टाकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे ४० हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल आणि अंदाजे ०.०७५ घनमीटर सागवानाचे चार चौपट, ज्याची किंमत सुमारे २ हजार रुपये आहे, असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले साहित्य यावल येथील मुख्य वनविभाग केंद्रात पावतीद्वारे जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी हरिपुरा वनपरिक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हरिपुरा येथील वनपाल करीत आहेत. आरोपीची ओळख पटवून त्याच्याविरुद्ध वन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि यावल पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल एस. बी. इंडे, वनरक्षक श्रीमती एस. पी. भालेराव, श्रीमती एस. एस. भोंगरे, योगेश मुंडे, चेतन शेलार, सुधीर पटणे तसेच वाहनचालक एस. एफ. पाटील आणि वनमजूर आर. एन. तडवी यांनी सक्रिय सहभाग घेतला.


Protected Content

Play sound