Home Cities जळगाव संतप्त लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल प्लाझा बंद करत छेडले आंदोलन

संतप्त लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल प्लाझा बंद करत छेडले आंदोलन

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नशिराबाद नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी रात्री नशिराबाद टोल प्लाझावर जोरदार आंदोलन करत काही काळ टोल प्लाझा बंद केला. अनेक निवेदने, बैठका आणि प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक लालचंद पाटील आणि बापू बोढरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. टोल प्लाझा काही काळ बंद राहिल्याने वाहतुकीवर तसेच टोल वसुलीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांसह शनिवारी घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि टोल वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

नशिराबाद नगरपरिषदेकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे यापूर्वीही महामार्गावरील विविध समस्यांसंदर्भात अनेक वेळा निवेदने आणि स्मरणपत्रे देण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीतही या विषयांवर चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ध्या सुरू असलेल्या पावसामुळे नशिराबाद-तरसोद मार्गावरील लहान बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून तेथे अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. पाण्याखाली स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांना या समस्येचा रोज सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. महामार्गालगतचा अरुंद सर्व्हिस रोड, अतिक्रमण न हटविता बांधण्यात आलेली गटारे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभावी नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या गैरसोयीमुळे लोकप्रतिनिधींविषयीही नाराजी व्यक्त होत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान टोल प्लाझावरील काही परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच स्थानिक नागरिकांकडून टोलची सक्ती केली जात असल्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. टोल प्लाझाच्या मेंटेनन्स विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. नशिराबाद शहराच्या विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. काझी पेट्रोल पंपाजवळ अंडरपास उभारणे, तरसोद उड्डाणपूल ते नशिराबाद टोल प्लाझापर्यंत रोडलॅम्पद्वारे प्रकाश व्यवस्था करणे, महालक्ष्मी मंदिर चौफुली येथे सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे, महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, तरसोद फाटा ते जळगाव खुर्ददरम्यान प्रवाशांसाठी निवारा शेड उभारणे तसेच चौबे पेट्रोल पंप परिसरासह विविध ठिकाणी सर्व्हिस रोडवरील पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय नशिराबाद-तरसोद मार्गावरील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करणे, धोकादायक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था उभारणे, अतिक्रमण हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करणे, गटारे व पाणी निचऱ्याचे योग्य नियोजन करणे, स्थानिक नागरिकांना टोलच्या त्रासातून दिलासा देणे आणि महामार्गावरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, या मागण्यांचाही आंदोलनकर्त्यांनी पुनरुच्चार केला.


Protected Content

Play sound