Home प्रशासन अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती; पिचर्डे परिसरात कृषी अधिकाऱ्यांची थेट शेतात पाहणी

अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती; पिचर्डे परिसरात कृषी अधिकाऱ्यांची थेट शेतात पाहणी

0
20

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिचर्डे परिसरातील शेती आणि खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांनी थेट शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पिचर्डे परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन, मका तसेच इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात फिरून नुकसानीची माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांकडूनही नुकसानाबाबत तपशील जाणून घेतला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांनी सांगितले की, कृषी आणि महसूल विभागाचे सर्व कर्मचारी नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे तातडीने पूर्ण करतील. कोणताही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. शासनाच्या नियमांनुसार सर्व नुकसानग्रस्तांची नोंद करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. पाहणीदरम्यान पिचर्डे-बात्सरचे तलाठी योगेश पाटील, मंडळ कृषी अधिकारी एस. जी. भालेराव, तसेच महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली.

यावेळी पिचर्डे येथील शेतकरी विनोद बोरसे, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांना देत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही प्राधान्याने केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound