Home आरोग्य ओव्हेरियन कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांच्या संयुक्त प्रयत्नातून...

ओव्हेरियन कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांच्या संयुक्त प्रयत्नातून ४० वर्षीय महिला कॅन्सरमुक्त

0
29

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील ४० वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला यश मिळाले असून संबंधित महिला कॅन्सरमुक्त झाली आहे. शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याने रुग्णाला आर्थिक दिलासाही मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संबंधित महिलेला सतत पोटदुखी, पोट फुगणे आणि अस्वस्थतेचा त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मृदुला मुंगसे आणि डॉ. प्राजक्ता पाटील यांनी सीटी स्कॅनसह आवश्यक तपासण्या केल्या. या अत्याधुनिक तपासणीत संबंधित महिलेला ओव्हेरियन (अंडाशयाचा) कॅन्सर असल्याचे निदान झाले. आजाराची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे यांना उपचारासाठी सहभागी करण्यात आले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने रुग्णावर सायटोरिडक्शन सर्जरी आणि डि-बल्कींग सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास पाच तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान अंडाशयाजवळील दोन मोठ्या कॅन्सरच्या गाठी यशस्वीरित्या काढण्यात आल्या. तसेच शरीरातील कॅन्सरग्रस्त ऊती शक्य तितक्या प्रमाणात काढून टाकण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या त्या पूर्णपणे बऱ्या होत आहेत. ही अत्यंत खर्चिक समजली जाणारी शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. तेजस सोनवणे, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. ऋचा गौर, डॉ. चंदन महाजन, डॉ. प्रचिती पथरदे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शितल फेगडे आणि डॉ. महाजन यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

याबाबत कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी सांगितले की, “ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य पोटदुखी, पोट फुगणे किंवा भूक कमी लागणे अशी असल्यामुळे महिलांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णाला चांगले आयुष्य मिळू शकते.” या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयपूर्ण कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, योग्य वेळी निदान आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे गंभीर कॅन्सरवरही प्रभावी मात करता येते, असा विश्वास या घटनेतून दृढ झाला आहे.


Protected Content

Play sound