भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर व उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. या विशेष मोहिमेत ६० हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर १०० संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. कारवाईदरम्यान अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अवैध शस्त्रे व चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
भुसावळ पोलीस उपविभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकांनी उपविभागातील विविध भागांत एकाच वेळी नियोजनबद्ध कारवाई केली. मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील ६० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच सुमारे १०० संशयितांची यादी तयार करून त्यांची चौकशी करण्यात आली. या कारवाईत २५ ते ३० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) असलेले आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे आणि चोरीच्या गुन्ह्यांतील संशयितांचा समावेश आहे. या मोहिमेतील महत्त्वाच्या कारवाईत रेल्वे पोलीस ठाण्यातील तीन नॉन-बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पंचशील नगर परिसरातून शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून अवैध कोयता जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act 4/25) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच चोरीचे भंगार खरेदी करणाऱ्या शेख सरदार शेख बशीर याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

दीपनगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे ५० किलो वजनाची चोरीची केबल आणि केबल कापण्यासाठी वापरण्यात येणारा कटर जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली. या व्यापक मोहिमेसाठी दोन प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), पाच पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार, आरपीएफचे तीन पोलीस निरीक्षक व २३ कर्मचारी तसेच जळगाव येथील तीन आरसीपी (RCP) प्लाटून तैनात करण्यात आले होते. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून उपविभागातील संवेदनशील भागांमध्ये एकाचवेळी तपासणी करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत भुसावळ शहर, बाजारपेठ, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भुसावळ पोलीस उपविभागात गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविले जात असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धडक कॉम्बिंग ऑपरेशन आणि विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने सुरू राहतील. कायदा मोडणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.



