Home आरोग्य मारूळ मध्ये डेंग्यू विरोधात आरोग्य विभागाची घराघरांत जनजागृती

मारूळ मध्ये डेंग्यू विरोधात आरोग्य विभागाची घराघरांत जनजागृती

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने जनजागृतीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. डेंग्यू प्रतिबंध महिन्याच्या निमित्ताने मारूळ गावात आरोग्य विभागाच्या वतीने घराघरांत जाऊन नागरिकांना डेंग्यू प्रतिबंध, स्वच्छता आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत “डेंग्यू प्रतिबंध महिना” साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत मारूळ येथे प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भारेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या सूचनेनुसार हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साकिब फारुकी, डॉ. दानिश खान आणि समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. शहनाज तडवी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या मोहिमेत आरोग्य सहाय्यक नाना खिस्ते, आरोग्य सेवक कोमल नेरकर व सुभाष ठाकूर तसेच आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. गावातील विविध भागांमध्ये घरभेटी देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसेच डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी आरोग्य सेवक कोमल नेरकर यांनी डेंग्यूची प्रमुख लक्षणे, वेळेवर उपचाराचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तर आरोग्य सेवक सुभाष ठाकूर यांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे तसेच डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे आवाहन केले.

मोहिमेदरम्यान कंटेनर सर्वेक्षण, घरभेटी, स्वच्छता अभियान आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य विभागाला सहकार्य करावे तसेच ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास विलंब न करता नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांनी केले आहे. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःची आणि परिसराची स्वच्छता राखणे हीच डेंग्यूपासून बचावाची सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound