अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) चोरीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सहा ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईत सहा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपशा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी 28 जुलै रोजी पहाटे सुमारे 1 ते 5 वाजेदरम्यान अमळनेर शहर हद्दीतील हिंगोणे गावालगतच्या परिसरात सापळा रचला. यावेळी अवैधरीत्या गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एमएच-19-सीजे-0775 क्रमांकासह एकूण सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक योगेश नामदेव भोई (वय 25), प्रवीण रघुनाथ सोनवणे (वय 36), राहुल छगन ठाकरे (वय 20), अर्जुन अशोक माळवे (वय 25), सतीश मोहन बाविस्कर (वय 32) आणि सोमनाथ पंकज सोनार (वय 20) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहनांचे मालक आणि या अवैध वाहतुकीशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोठा दणका बसला असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवायांना अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांनाही अवैध गौण खनिज उत्खनन अथवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.



