Home न्याय-निवाडा ‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक’ – ॲड. अर्जुन पाटील

‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक’ – ॲड. अर्जुन पाटील

0
16

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत बोदवड न्यायालय परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. बोदवड तालुका वकील संघ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात तब्बल 501 फळझाडे लावून त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याचा संकल्प बोदवड वकील संघाने जाहीर केला.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. “निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वृक्षांचे संवर्धन केल्यासच पुढील पिढीला निरोगी आणि सुरक्षित पर्यावरण मिळेल,” असे ते म्हणाले. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे बोदवड वकील संघाने प्रत्येक वकील बांधवाच्या वाढदिवसानिमित्त न्यायालय परिसरात एक झाड लावण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. खोल्लम, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, तसेच सर्व वकील, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘वृक्षांचे महत्त्व, निसर्गोपचार आणि सात्विक आहार’ या विषयावर ॲड. अर्जुन पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाचा उल्लेख करत वृक्ष आणि मानव यांच्यातील अतूट नात्यावर प्रकाश टाकला. निसर्गातून मिळणारी फळे, शुद्ध आहार आणि नैसर्गिक जीवनशैली ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

“प्रकृतीशी आणि निसर्गाशी घट्ट नाते जोडा, निसर्गाचा आदर करा. निसर्गातून मिळणारे अन्न आणि फळे हीच खरी संजीवनी आहेत. पर्यावरणाचे रक्षण केले तर आरोग्य आपोआप चांगले राहील,” असे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. अमोल परदेशी, ॲड. ईश्वर डी. पाटील, ॲड. योगेश राजपूत, ॲड. के. एस. इंगळे, ॲड. धनराज प्रजापती, ॲड. जाधव, ॲड. चंद्रसिंग पाटील, ॲड. समीर शेख, ॲड. कल्पेश बडगुजर, ॲड. अमोलसिंग पाटील, ॲड. मीनल अग्रवाल, ॲड. शारदा राऊत, पीएसआय शुभम जाधव, पोलीस कर्मचारी तसेच न्यायालय अधीक्षक पिगाणे नाना यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बोदवड वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, बिलीफ वर्ग, पोलीस कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound