Home प्रशासन मुक्ताईनगरात डंपरच्या निष्काळजीपणामुळे विद्युत तारा तुटल्या ; सिमेंट पोल कोसळला

मुक्ताईनगरात डंपरच्या निष्काळजीपणामुळे विद्युत तारा तुटल्या ; सिमेंट पोल कोसळला

0
13

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील वॉटर सप्लाय कार्यालयाजवळ डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे रविवारी (दि. 26 जुलै) रात्री मोठी दुर्घटना घडण्याचा प्रसंग उद्भवला. डंपरच्या ट्रॉलीचा हायड्रॉलिक भाग वर ठेवून वाहन चालविल्याने रस्त्यावरील विद्युत तारा तुटून खाली पडल्या, तर महावितरणचा सिमेंट पोलही कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संबंधित चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रविवारी रात्री सुमारे 11.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डंपर चालकाने हायड्रॉलिक ट्रॉली पूर्णपणे खाली न करता वाहन चालविल्यामुळे ट्रॉलीचा भाग थेट विद्युत तारांना लागला. त्यानंतर तारा तुटून रस्त्यावर कोसळल्या आणि महावितरणचा सिमेंट पोलही तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. घटनेमुळे काही घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्या वेळी परिसरात महिला, नागरिक आणि काही मुलेही उपस्थित असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी आरडाओरड करून चालकाला वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर येथील रहिवासी शोभा सहदेव तायडे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित डंपर चालक तसेच वाहनाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वारंवार घडणाऱ्या अशा निष्काळजी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जड वाहने चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मुक्ताईनगर शहरात वाढत्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound