Home Cities अमळनेर दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ अमळनेरात भाजपला धक्का ; शहर उपाध्यक्ष श्याम पाटील यांचा...

दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ अमळनेरात भाजपला धक्का ; शहर उपाध्यक्ष श्याम पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

0
9

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर झालेल्या कथित पोलिसी लाठीमाराच्या निषेधार्थ अमळनेरातील भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती श्याम जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

श्याम पाटील यांनी रविवारी (दि. २६ जुलै २०२६) भाजपचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्याकडे आपला अधिकृत राजीनामा सादर केला. राजीनामा पत्रामध्ये त्यांनी पक्षात कार्यरत असताना समाजहितासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत, अलीकडील दिल्लीतील घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्याचा तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी केलेल्या शांततामय आंदोलनावर संवाद साधून तोडगा काढण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करण्यात आल्याची घटना लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या घटनेनंतर आपल्या वैचारिक भूमिकेत आणि पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीत मूलभूत मतभेद निर्माण झाल्याचेही श्याम पाटील यांनी म्हटले आहे. तत्त्वांशी तडजोड करून केवळ सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक प्रामाणिकपणाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करत शहर उपाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही तत्काळ प्रभावाने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.

अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेले श्याम पाटील यांचा हा निर्णय अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नावर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांचा निर्णय आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का, तसेच ते भविष्यात कोणती राजकीय दिशा स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्याम पाटील यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक भाजप संघटनेतही विविध स्तरावर चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे अमळनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound