Home करियर लाड वंजारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी व शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

लाड वंजारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी व शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  लाड वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव तसेच समाजातील विविध शासकीय पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मेहरूण येथील लाड वंजारी मंगल कार्यालयात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वंजारी युवा संघटना जळगाव जिल्हा, समस्त लाडवंजारी श्रीराम मंदिर संस्था (मेहरूण) आणि भगवान सेना जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतानाच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संत भगवान बाबा आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत नाईक यांनी सादर करत आयोजनामागील उद्देश आणि समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याची भूमिका स्पष्ट केली. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यासोबतच लाड वंजारी समाजातील विविध शासकीय विभागांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या संयुक्त सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या कौतुक सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील लाड वंजारी समाजातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुलांच्या यशाचा गौरव पाहण्यासाठी पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुणवंत विद्यार्थ्यांवर उपस्थितांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.


Protected Content

Play sound