Home क्राईम पंढरपूर वारीदरम्यान सावखेडा सिमच्या वारकरी महिलेचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

पंढरपूर वारीदरम्यान सावखेडा सिमच्या वारकरी महिलेचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

0
10

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंढरपूर वारीसाठी गेलेल्या यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील एका वारकरी महिलेचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली असून वारकरी संप्रदायातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा सिम येथील अंजनाबाई रामलाल पाटील (वय ६५) या धार्मिक भावनेने पंढरपूर वारीसाठी बसने गेल्या होत्या. गाणगापूर आणि तुळजापूर येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू होता. दरम्यान, मोहोळ परिसरात त्या शौचासाठी बसमधून खाली उतरल्या असता, एसटी महामंडळाच्या एमएच १४ एनई ७१६० क्रमांकाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात अंजनाबाई पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना भाजप कार्यकर्ते दिनेश पाटील आणि कमलाकर पाटील यांनी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आमदार जावळे यांनी तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून शवविच्छेदनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

यानंतर अंजनाबाई पाटील यांचे पार्थिव सावखेडा सिम येथे आणण्यात आले. शुक्रवार, २४ जुलै रोजी दुपारी गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या रामलाल नागो पाटील यांच्या पत्नी होत्या. वारीच्या पवित्र प्रवासादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, वारकरी संप्रदायातील भाविकांनी अंजनाबाई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी यात्रेदरम्यान वाहतूक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound