जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगवान आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पिंप्राळा परिसरातील घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे ३७ हजार ८०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
दिनांक ७ जुलै २०२६ रोजी पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील एका पान मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स तसेच रोख रक्कम असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना सखोल तपास करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि दिपक भगवान सोनवणे (वय २०, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत दोन्ही आरोपींनी सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पार पडली. या तपासात पोहेकॉ. सुखाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर नवघरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचे योगदान दिले.



