जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी विश्वासार्ह आकडेवारी संकलित करण्यासाठी भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत (MOSPI) कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) मार्फत सन २०२६ मध्ये विविध राष्ट्रीय सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातही जुलै ते सप्टेंबर या कालावधीत क्षेत्रीय अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित करणार असून, नागरिकांनी अचूक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे सन १९५० पासून देशभरात विविध सांख्यिकी सर्वेक्षणे नियमितपणे राबवत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS), वार्षिक असंघटित क्षेत्र उपक्रम सर्वेक्षण (ASUSE), किंमत आकडेवारी संकलन, अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (AIDIS), शेतकरी स्थिती मूल्यांकन सर्वेक्षण (SAS), स्थलांतर तपशील सर्वेक्षण (MPS), राष्ट्रीय कुटुंब उत्पन्न सर्वेक्षण (NHIS), वार्षिक उद्योग सर्वेक्षण (ASI), कृषी सांख्यिकी पर्यवेक्षण, वार्षिक निगमित सेवा क्षेत्र उपक्रम सर्वेक्षण (ASISSE-2026), कार्यरत सहकारी संस्थांचे द्रुत सर्वेक्षण (RSFC-2026) तसेच नागरी फ्रेम सर्वेक्षण (UFS) आदी महत्त्वाची सर्वेक्षणे केली जाणार आहेत.

या सर्वेक्षणांमधून रोजगार व बेरोजगारी, असंघटित उद्योग, कृषी कुटुंबांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, स्थलांतर, कुटुंबांचे उत्पन्न, उद्योग, सेवा क्षेत्र, सहकारी संस्था तसेच विविध वस्तूंचे किंमत निर्देशांक यासंबंधीची माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे देशासाठी विश्वासार्ह व्यापक आर्थिक निर्देशक तयार करण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे नियोजन, धोरणनिर्मिती आणि विकासात्मक निर्णय अधिक परिणामकारकपणे घेण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षण प्रगणक (संख्या मित्र), कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कृषी सांख्यिकी पर्यवेक्षणाच्या कामात राज्य शासनाचे संबंधित अधिकारीदेखील सहभागी होणार असून, सर्वेक्षण प्रक्रिया पारदर्शक आणि शास्त्रीय पद्धतीने पार पाडली जाणार आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील निवडक गावे आणि शहरी भागांमध्ये क्षेत्रीय अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती संकलित करतील. या माहितीचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशासाठी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता योग्य, सत्य आणि अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सहायक निदेशक तथा कार्यालय प्रमुख पी. व्ही. पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, राष्ट्रीय सर्वेक्षणांमधून मिळणारी माहिती ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, यामुळे विकासाभिमुख आणि लोकहितकारी धोरणे अधिक प्रभावीपणे तयार करण्यास मदत होईल.



