फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथे सामाजिक बांधिलकी जपत अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. अमर संस्था, चोपडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी कार्यक्रमात गरजू, निराधार, बेवारस आणि वंचित घटकांना अन्नदान करून मानवतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २१ जुलै रोजी चोपडा येथील आश्रमशाळेत आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस फैजपूर शहराध्यक्ष कृष्णा चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत अन्नदान कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र वर्मा, पंकज मिस्त्री, वेदांत कुलकर्णी आणि जतिन सूर्यवंशी यांनीही सहभाग नोंदवत सामाजिक उपक्रमात आपले योगदान दिले. या अन्नदान उपक्रमाचा लाभ बेवारस मनोरुग्ण, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, बालकाश्रमातील मुले तसेच मानवसेवातीर्थातील लाभार्थी यांनी घेतला. समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमामुळे सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख कुर्बानभाई, रज्जाकभाई आणि आवेश भांजा यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण उपक्रम सुरळीतपणे पार पडला. उपस्थितांनी आयोजकांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाजातील गरजूंसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. अन्नदानासारख्या सामाजिक कार्यातून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक विचारांना आणि जनसेवेच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



