फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या सायबर अवरनेस जनजागृती अभियानांतर्गत मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूर येथे गुरुवारी (दि. 23 जुलै) ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ या उपक्रमांतर्गत सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात पीएसआय बोकील, एएसआय आशा तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर सोनवणे यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत शाळेत ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, सुरक्षिततेचे विविध पैलू आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनच्या लँडलाईनवर संपर्क साधावा, आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 वर फोन करावा तसेच शाळेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या तक्रार पेटीत तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडिया फसवणूक, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड, फेक लोन फ्रॉड, सायबर स्टॉकिंग, फिशिंग अटॅक, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक तसेच ऑनलाइन बदनामी यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. अशा गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती, एटीएम कार्डची माहिती, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला. सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिषे दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याने प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना अधिक दक्षता बाळगावी, असेही सांगण्यात आले.

सायबर फसवणुकीचा कोणताही प्रकार घडल्यास वेळ न दवडता 1930 या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना जागरूक, सतर्क आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचा संदेश देण्यात आला. डिजिटल युगात सायबर सुरक्षेबाबत योग्य माहिती आणि तत्परता हीच सर्वात प्रभावी सुरक्षा असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले. कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य वाहिद सर तसेच शिक्षक मलिक आबिद सर यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी अधिक जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.



