Home Cities जळगाव लैंगिक छळमुक्त कार्यसंस्कृतीसाठी गोदावरी स्कूलचा उपक्रम; पॉश अ‍ॅक्ट ओरिएंटेशन उत्साहात

लैंगिक छळमुक्त कार्यसंस्कृतीसाठी गोदावरी स्कूलचा उपक्रम; पॉश अ‍ॅक्ट ओरिएंटेशन उत्साहात

0
38

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (पॉश अ‍ॅक्ट २०१३)” या विषयावर ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांना कायद्याविषयी सखोल माहिती देत सुरक्षित आणि संवेदनशील कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे यांनी पॉश अ‍ॅक्टची गरज, उद्दिष्टे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थेने संवेदनशील आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकीदेखील असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कर्मचारी हक्क व जबाबदाऱ्या, लैंगिक छळाची व्याख्या, त्याचे विविध प्रकार, अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) ची रचना व कार्यपद्धती, तसेच तक्रार दाखल करण्याची आणि तिच्या निवारणाची प्रक्रिया उदाहरणांसह समजावून सांगितली. कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ सहन न करता योग्य माध्यमातून तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. संवादात्मक पद्धतीने आयोजित या सत्रामुळे उपस्थितांना पॉश अ‍ॅक्टबाबत अधिक स्पष्टता मिळाली. तसेच कार्यस्थळी परस्पर सन्मान, समानता आणि सुरक्षिततेची जाणीव अधिक दृढ झाली. या ओरिएंटेशन कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा प्रशासनाने विशेष नियोजन व परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Protected Content

Play sound