दिल्ली- वृत्तसेवा। नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी आक्रमक वळण घेतले. संसदेवर मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था उभारली असून, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराचा वापर केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
संसदेकडे मोर्चा निघू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग केले होते. अभिजीत दिपके यांच्यासह अनेक आंदोलकांना आंदोलनस्थळीच रोखण्यात आले. मात्र, सीजेपीच्या समर्थकांचा एक वेगळा गट संसद भवन परिसरात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडियावर दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा दावा सौरभ दास यांनी केला. त्यांनी सर्व खासदारांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असताना सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जवळपास दोन तास प्रतीक्षा करायला लावल्यानंतर केवळ दहा मिनिटांचीच भेट दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ दास यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, पक्षाच्या सर्व मागण्यांचे निवेदन लेखी स्वरूपात सादर करण्यात आले असून पुढील चर्चेचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार संसद भवन परिसरात सुमारे 75 हजार आंदोलक जमा झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले, तर काही आंदोलकांनी ते ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेले हे आंदोलन आता राष्ट्रीय स्तरावरील राजकीय आणि प्रशासकीय चर्चेचा विषय बनले असून, आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.


