Home Cities जळगाव पर्यावरणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार; गायत्रीनगरात ६० देशी वृक्षांची लागवड

पर्यावरणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार; गायत्रीनगरात ६० देशी वृक्षांची लागवड

0
34

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरणाचे संरक्षण आणि शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जळगावातील गायत्रीनगर परिसरात रविवारी ६० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून आणि LNS हायस्कूलच्या १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गायत्रीनगर ओपन स्पेस तसेच निमजाय माता मंदिर परिसरात विविध सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी स्वच्छ, हरित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपणासोबतच रोपांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचाही संकल्प सहभागी नागरिकांनी केला.

या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजाच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वृक्षारोपण मोहिमेची संकल्पना LNS हायस्कूलच्या १९८८ च्या बॅचशी संबंधित गौरव पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला बॅचमधील माजी विद्यार्थी आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली. यामध्ये वड, पिंपळ आणि इतर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.  या मोहिमेत LNS हायस्कूल ‘८८ बॅचचे राहुल कुलकर्णी, अमोघ जोशी, संजय पाटील, रवी गावंडे, आनंद तारे, प्रवीण वाणी, प्रभाकर जाधव यांच्यासह भास्कर सोनार, राहुल पाटील, संजय वाल्हे, तुषार पाटील, धनराज पाटील, पंकज सोनवणे, सचिन वाघ, केतन निसाड, सूरज राठोड आणि परिसरातील अनेक नागरिकांनी श्रमदान करून उपक्रम यशस्वी केला.

 


Protected Content

Play sound